भुवनेश्वर (वृत्तसंस्था) – ओडिशातील दिघामध्ये काही मच्छिमारांचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. या मच्छिमारांच्या जाळ्यात 121 ‘तेलिया भोला’ नावाचे मासे अडकले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या माशांची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे.
या प्रत्येक माशाचे वजन 18 किलो किंवा त्याहून अधिक असल्याचा अंदाज आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या मच्छिमारांनी याआधी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘तेलिया भोला’ मासा पकडला नव्हता.
गेल्या वर्षीही मच्छिमारांना दिघा किनार्यावरुन तेलिया भोला मासा सापडला होता, मात्र त्यांची संख्या तेव्हा 30 होती. त्यावेळी त्यांना त्या माशाचे एक कोटी रुपये मिळाले होते. मात्र यावेळी माशांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मासे उपलब्ध झाल्याने मच्छिमार सुखावले आहेत. या माशांनी अनेक मच्छिमारांना श्रीमंत केले आहे.
एका मोठ्या व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीचा मासा खोल समुद्रात आढळतो. पण, या माशांची किंत जास्त असल्यामुळे लोभापोटी मच्छीमार परवानगी नसलेल्या भागातही मासे पकडण्यासाठी जातात. या सर्व गोष्टीमुळेच या माशांची किंमत एवढी जास्त असते. या विशिष्ट प्रकारच्या माशाची किंमत साधारणत: 13000 रुपये प्रतिकिलो असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ओडिशातील राजनगरमधील तलचुआ भागातून मच्छिमारांनी एक अनोखा मासा पकडला होता. हा मासा 10 हजार रुपये किलो दराने व्यावसायिकाला विकला जात होता. त्या माशाची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये होती. त्या माशाला मयुरी मासादेखील म्हणतात. या दुर्मिळ प्रजातीच्या माशांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विकण्यापूर्वी ते सार्वजनिक पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.
एकतर हे मासे खोल समुद्रात आढळतात आणि तिथून त्यांना पकडणे अवघड काम आहे. तसेच, हे तेलिया भोला मासे इतके महाग असण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांच्या पोटात अनेक फायदेशीर घटक आहेत. या माशाचे सर्वात मोठे खरेदीदार औषध कंपन्या आहेत. या माशांचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.