जळगाव ( प्रतिनिधी ) – कुत्र्यावरून झालेल्या किरकोळ वादात फिर्यादी आणि त्याच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या आणि जवळपास ५ वर्षे ३ महिने फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे .
6 ऑक्टोबर , 2015 रोजी शहरात नविन जोशी कॉलनी येथे आरोपी गिरीष अशोक गायकवाड याचा पाळीव कुत्रा सुरेश मधुकर गायकवाड यांच्या रिक्षा मध्ये बसलेला असतांना सुरेश गायकवाड यांनी कुत्र्यास हाकलल्याचा राग आल्याने गिरीष गायकवाड याने सुरेश गायकवाड व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून दगड सुरेश गायकवाड यांच्या डोक्यावर मारुन दुखापत केली होती.सुरेश गायकवाडयांनी दिलेल्या फिर्यादीवरून गिरीष गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी गिरीष गायकवाड शहरातून फरार होता. तो जळगाव शहरात आल्याची माहीती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर त्यास स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी न्यु जोशी कॉलनी येथुन ताब्यात घेतले आहे.