मुंबई (वृत्तसंस्था ) – पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्यावतीने आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका केली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपने मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये आंदोलन करत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाईसाठी राज्यपालांना भेटून निवेदन दिले जाणार असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
मुंबईतील दादरमध्ये गोमूत्र पाज आंदोलन भाजपने केले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर पुण्यात अलका चौकात भाजपने आंदोलन केले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या सिडको चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.