धारागिर येथून पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त ;
जळगाव राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव कार्यालयाच्या पथकाने धरणगाव येथे बनावट मद्याच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईनंतर पोलीस कोठडीतील भूपेंद्र मराठेने दिलेल्या माहितीवरून सचिन पाटील या पाचव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे . त्यानंतर एरंडोल तालुक्यातील धारागिर येथे टाकलेल्या धाडीत सुमारे १ लाख ६० हजाराच्या बनावट दारूसह एक वाहन मिळून असा एकूण पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . या टोळीतील सहावा आरोपी फरार झाला आहे .
सचिन पाटीलकडे या टोळीने तयार केलेल्या बनावट मद्याच्या वितरणाची जबाबदारी होती . भूपेंद्र गोकुळ मराठे(धरणगाव) याने दिलेल्या माहितीवरून धारागिर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातील कडबा गंजीमध्ये दडवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट टॅंगो पंच देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले . या दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ लाखांची मिनिट्रक ( एम एच – १८ – ए ए ८६८४ ) यावेळी जप्त करण्यात आली आहे . सचिन पाटील याला पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते त्याला आज धरणगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे . ही कारवाई जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांचे नेतृत्वाखाली निरीक्षक सी एच पाटील , दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, आनंद पाटील, जवान एन.व्ही. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहूल सोनवणे यांच्या पथकाने केली आहे . जिल्ह्यातील ही मोठी कारवाई ठरल्याने या टोळीतील आणखी संशयित हाती लागण्याची शक्यता आता वाढली आहे . वाढणारे संशयित आणि या टोळीच्या जिल्ह्याबाहेरील जाळ्याचे धागेदोरे किती व्यापक आहेत हे तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होणार आहे .
या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा आणि काल पोलीस कोठडीतील आरोपीने दिलेल्या माहितीनंतर ७ लाख ७३ हजार ४०० असा १८ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला . या टोळीला स्पिरिट , रिकाम्या बाटल्या , झाकणे आदी कच्चा माल पुरविणारा सहावा आरोपी मात्र फरार आहे . त्याचा शोध घेतला जात आहे . हा फरार आरोपी धुळ्यातील असावा असा संशय आहे .