पुणे (वृत्तसंथा) – मार्केटयार्डात शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.2) मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे हा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या शेजारच्या गावातील आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना लुटणे, धमकावणे, शेतमालाची चोरी करण्याच्या घटना घडल्या आहेत.
मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. बाजार समित्यांची स्थापना शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या हेतूने झाली आहे. शेतकऱ्यास मारहाण करणारी व्यक्ती मार्केटयार्डातच डमी कामगार म्हणून कार्यरत आहे.त्यावर गुन्हा दाखल झाल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रशासक देशमुख यांनी मार्केटयार्डातील सुरक्षिततेसाठी कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये फळे आणि भाजीपाला विभागातील बाजार आवार कोणत्याही दुचाकींना प्रवेश दिला जात नाही. तसेच बाजाराच्या वेळा निश्चित केल्या आहेत. डमी आडत्यांवर निर्बंध घातले आहेत, तसेच बाजाराशी संबंध नसणाऱ्या व्यक्तींना आवारात मनाई केली आहे. यासह अन्य काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे बाजार आवार सुरळीत चालण्यास मदत होत आहे. मात्र, तरीही काही चुकीच्या घटना मार्केटयार्डात घडत आहेत. यावर प्रशासकांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी बाजार घटकांमधून होत आहे. शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्याला शासन करण्यासाठी कायदेशीर कारवाई केली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मार्केटयार्डात रात्रीची गस्त असतेच. ती सुरूच राहणार आहे. अशा घटनांवर जरब बसावी, यासाठी उपाययोजना केल्या जातील.- बी. जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती