जळगांव ( प्रतिनिधी ) – आक्षेप पडताळणीनंतरची पोलीस भरतीची जळगाव जिल्ह्याची तात्पुरती प्रतिक्षा यादी पोलीस खात्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे .
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार जिल्हा पोलीस शिपाई भरती २०१९ ची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी ही मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे फेरपडताळणी व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहुन तयार करण्यात आली होती. तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी १३ जानेवारीरोजी जळगांव पोलीस दलाच्या www.jalgaonpolice.gov in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तात्पुरत्या निवड यादीबाबत व तात्पुरत्या प्रतिक्षा यादीबाबत उमेदवारांकडून हरकती व आक्षेप मागविण्यात आले होते. प्राप्त आक्षेपाबाबत पोलीस भरती २०१९ निवड मंडळाकडून पडताळणी करून सुधारित तात्पुरती निवड यादी व सुधारित तात्पुरती प्रतिक्षा यादी १८ जानेवारीरोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुधारित तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार फेरपडताळणी आल्यानंतर अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.
सुधारित तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी २४ जानेवारीरोजी सकाळी ०९.०० वाजता मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगांव याठिकाणी न चूकता दोन फोटो सर्व शैक्षणिक व आवश्यकती ती मुळ कागदपत्र तसेच सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीच्या दोन संचासह उपस्थित रहावे
सुधारित तात्पुरत्या निवड यादीमधील निवड ही भरती निकषांच्या पूर्ततेच्या अधीन असून त्यामध्ये अपात्र झाल्यास सुधारित तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा , तक्रार , हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. पोलीस भरती प्रक्रिये संदर्भात अंतिम निर्णय पोलीस भरती निवड समितीचा राहील , असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले .