पुणे ( प्रतिनिधी ) – पिंपरी पोलिसांकडे 70 वर्षीय महिलेने 85 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. या महिलेचे व प्रियकराचे प्रेमसंबंध होते. यातून मुले जन्माला आली मुलांची डीएनए टेस्ट केल्यानंतर हा व्यक्ती मुलांचा बाप असल्याचे समोर येईल. अशी कैफियत महिलेने पोलिसांकडे मांडत मदत मागितली आहे. यावर ‘ तो ‘ म्हणतोय की …. ‘ तिला ‘ झालेली मुलेही माझीच , त्यांनीच मला सांभाळावे !
पश्चिम महाराष्ट्रातून एक तरुण नोकरीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये आला. खासगी कंपनीत त्याला नोकरी मिळाली , नोकरीत असतानाच त्या तरुणाच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुढे त्याचे त्याच्या मेव्हणीसोबत दुसरे लग्न झाले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला आठ मुले झाली. दरम्यान त्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेम जुळले. त्यांना मुलेही झाली. कालपरत्वे तो तरुण नोकरीतून निवृत्त झाला.व आपल्या गावी जाऊन स्थायिक झाला. संबंधित तरुणीही आपल्या मुलांमध्ये रमली. वयानुसार दोघांच्या भेटीगाठी कमी झाल्या. दोघेही वृद्धावस्थेत आले वृद्धपणामुळे दोघांचेही स्वकमाईचे मार्ग बंद झाले. उदर निर्वाहासाठी आर्थिक चणचण भासू लागली तेव्हा वृद्ध महिलेने त्या व्यक्तीकडे मदत मागितली. मात्र तो व्यक्तीही वृद्ध झाल्याने त्याने असमर्थता दर्शवली. यातूनच वाद निर्माण झाला व वृद्ध महिलेने पोलिसात धाव घेतली !
या वृद्ध महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या वृद्ध प्रियकराशी संपर्क साधला. त्यावेळी ती व्यक्ती अंथरुणाला खिळलेली आढळली. दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुले खर्चासाठी जे पैसे देतात. त्यावर गुजराण करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले . संबंधित वृद्ध महिलेसोबत माझे संबध होते अशी कबुलीही दिली. मात्र सद्यस्थितीत मी तिला मदत करु शकत नसल्याचेही त्याने सांगितले. महिलेच्या डीएनए टेस्ट करण्याबाबतच्या तक्रारीवर त्यानं त्याची गरज नसून ती मुले माझी आहेत हे मी मान्य करतो. त्यामुळे त्यांनीच माझा या वृद्धापकाळात सांभाळ करावा असे म्हटले आहे ! यामुळे पोलीसही चक्रावले आहेत !