जळगाव ;- संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर सर्व गोष्टींची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु जळगाव जिल्हयात आहोरात्र तंबाखू, गुटखा आणि मद्य विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुधाबरोबरच तंबाखू, गुटखा अशा पदार्थांचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. सर्वत्र ह्या पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याने अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये ही विक्री करून नागरिकांची लूट केली जात आहे. तंबाखूची पुडी हवीय’’, ‘‘हो भेटेल ना’’, ‘‘कितीला आहे?’’, ‘‘पन्नास रुपये.’’ हा संवाद आहे, तंबाखू विक्रेत्यासोबतचा. सध्या केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र, शहरात सर्रासपणे चौपट-पाचपट दराने तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत असल्याचे उघड झाले. दुकानांमधून विकता येत नसल्याने फोनवरून वैयक्तिकरित्या भेट घेत किंवा घरातून विक्री केली जात असल्याचे समोर आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा व मद्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू भेटणार नाही, पण तंबाखू, गुटखा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. किराणामालाच्या दुकानांतून किंवा घरातून हा माल विकला जात आहे. संबंधित विक्रेता फोनवरून ऑर्डर घेत दहा रुपये किंमत असलेली तंबाखूची पुडी चाळीस रुपयांपासून ऐंशी रुपयांपर्यंत विकत आहेत.
करोनाचा प्रसार होण्यास मदत
काहीजण गुटखा विकत आहेत. परंतु खाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांचीही तलफ भागवली जात आहे. तंबाखू, गुटखा चघळणारे वाटेल तिथे थुंकत असल्याने करोनाचा प्रसार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.