कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्गदेखील झाला होता. परंतु या वयातदेखील त्यांनी कोरोनावर मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतलं होतं.
ते १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर , १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य होते . शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२ , सिनेट सदस्य १९६५ , कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८ , सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८ , सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१ , रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून आता पर्यंत , रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून आतापर्यंत , दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष १९८५ पासून आतापर्यंत होते .
१९४८ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला . १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस , १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य , १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस , १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य , १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी ) , १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार , महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते अशी पदे त्यांनी भूषविली होती .