मुंबई वृत्तसंस्था ;- प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज (८३) यांनी रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या साकेत रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायिका मालिनी अवस्थी आणि अदनान सामी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मालिनी अवस्थी यांनी लिहिले- आज भारतीय संगीताची लय थांबली आहे. सूर शांत झाले. भाव शून्य झाले. कथ्थकचे राजे पंडित बिरजू महाराज राहिले नाहीत. कालिकाबिंदादिन जींच्या वैभवशाली परंपरेचा सुगंध जगभर पसरवणारे महाराज अनंतात विलीन झाले.
देवदास, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी संगीत दिले होते.