जळगाव : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असताना व जिह्यात जमावबंदी असताना जळगावातील आर.के.वाईनवरून विदेशी दारू, बियरची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एलसीबीच्या पथकाने कारवाई करून छापा टाकला होता. आर.के. वाईनच्या तपासणीतून अमळनेर कनेक्शन असल्याची बाब उघड झाली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अमळनेर येथील वाइन व बियर बार अशा जवळपास १५ ठिकाणी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेरातील काही बियरबार, देशी दारू व वाईन शॉप तपासणीत मालाच्या साठ्यात तफावत तसेच अनियमितता आढळून आल्याने दोन वाईन शॉप, दहा बियरबार तीन देशी दारूची दुकाने असे एकूण १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून मुद्देमाल सील करण्यात आला आहे.
अमळनेरात मोठी कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या जळगावातील आर.के.वाईन्सवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमाअयडीस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. के. वाईन्स प्रकरणाचे अमळनेर कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव, भुसावळ, अमळनेर, पाचोरा येथील निरिक्षक, दुय्यम निरिक्षक तसेच कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी अमळनेरात धाडसत्र राबविले. यात १५ परमिटरुम बियरबार, २ वाईनशॉप व १ बियरशॉपी, व ७ देशी दारुची दुकाने अशा २५ ठिकाणी पथकांकडून तपासणी करण्यात आली. यापैकी १५ ठिकाणी त्रुटी तसेच साठ्यात तफावत व अनियमितता दिसून आली. याप्रकरणी संबंधित मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
व्यावसायीकवर गुन्हे
पथकाने केलेल्या तपासणीत मद्यसाठ्यात तफावत, नोंदवह्या अपूर्णता, इत्यादी त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.