जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यात धाड टाकून बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तसेच पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या आदेशावरून मुक्ताईनगर तालुका येथे बनावट मध्य तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तालुक्यातील कुर्हा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला.
तेथे अमोल एकनाथ वानखेडे हा त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याबाबत दिसून आले. त्याच्या घराची झडती घेतली असता गच्चीवर एकूण ३६ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हवालदार सुनील दामोदर, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, रवींद्र पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांच्यासह मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार माणिक निकम, कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.