मुंबई (वृत्तसंस्था) – पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांना जमावाने बेदम मारहाण करून ठार मारल्याच्या गुन्ह्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA द्वारे करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात १६ मार्चच्या रात्री दोन साधू व त्यांच्या गाडी चालकास चोर असल्याचा संशयावरून बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. साधू व चालकास मारहाण करत असताना पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते मात्र त्यांना प्रक्षोभक जमावास रोखता न आल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. साधूंची हत्या झाल्याने या घटनेस धार्मिक किनार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोपींची नावं उघड करत घडलेल्या प्रकारास धार्मिक वळण न देण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे या घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोर शासन करण्यात येईल असं सांगितलंय. अशातच आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.