जळगाव ( प्रतिनिधी ) – आव्हाणे येथील ३१ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोल छगन सपकाळे (वय-३१ , रा. आव्हाणे ता. जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे. अमोल सपकाळे हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहनचालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली अमोलने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
जळगाव स्टेशनमास्तर यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात नोंद करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोनि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील पाटील आणि दिपक कोळी यांनी रात्री उशीरा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . पुढील तपास सुशील पाटील व दिपक कोळी करीत आहे.