न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – सगळीकडे जग कोरोनाशी लढत आहे तर ज्याठिकावरून कोरोनाचा उगम झाला त्या चीनने आता करोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. तिथे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. चीनमध्ये गुरुवारी फक्त सहा नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. फक्त सहा जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याविषयीची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.
यात दोन बाहेरुन आलेले रुग्ण आहेत तर चार जणांना देशांतर्गतच संक्रमणातून करोनाची बाधा झाली. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी ही माहिती दिली. चीनमध्ये सध्या बाहेरुन करोनाची बाधा होऊन आलेले १६१८ रुग्ण आहेत. यात ३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर ३४ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण त्यांच्यात ताप, सर्दी, घसादुखी असे करोनाचे कुठलेही लक्षण आढळलेले नाही. लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे इतरांमध्ये करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे.
चीनमध्ये करोनामुळे आतापर्यंत ४,६३२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. हुबेई प्रांताची राजधानी असलेले वुहान शहर करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे. मागच्या काही दिवसात वुहानमध्ये करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही किंवा करोनामुळे कोणाचा मृत्यू झालेला नाही. आठ एप्रिलला चीनने वुहानमधून लॉकडाऊन काढला.