मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे . राज्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ७७८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६४३० वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील ६, पुण्यातील ५, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ वर पोहोचली आहे.महाराष्ट्रात आजपर्यंत ८४० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा आज २३ हजाराच्या पार गेला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासात, १६८४ प्रकरणे आणि ३७ मृत्युंची नोंद झाली आहे, यानुसार आतापर्यंत कोरोनाचे २३,०७७ रुग्ण देशात आढळले आहेत. ही आज,२४ एप्रिल २०२० च्या सकाळी ८ वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. यानुसार, सद्य घडीला कोरोनाच्या १७४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, ४७४९ जण बरे झाले आहेत तर ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण हा स्थलांतरित आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा ६४३० वर पोहचला आहे. यामध्ये एकट्या मुंबईतच कोरोनाचे ४२३२ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची देशातील आकडेवारी महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात (२६२४ रुग्ण), दिल्ली (२३७६ रुग्ण), राजस्थान (१९६४ रुग्ण) या राज्यात सुद्धा चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे,कालपासून केंद्र सरकारच्या वतीने देशातील आणखीन काही उद्योगांना लॉक डाऊन काळात काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा काही ठिकाणी उद्योग सुरु होतील, मात्र यावेळी सर्वांना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असणार आहे, विनाकारण गर्दी केल्यास ही परिस्थिती आणखीन बिघडू शकते.







