मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं म्हटलंय. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले .
राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले.
राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकारने दिलाय.