जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन येत्या ५ जानेवारीपासून ७ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे . या अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ६९ वे वर्ष आहे .
यंदाच्या सप्ताह महापूजेची मांडणी सौ. ज्योती आणि विलास माळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . पालकमंत्री गुलाबराव पाटील या सप्ताह शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत . जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन या सप्ताह आयोजनासाठी विशेष सहकार्य करीत आहेत .
या सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकडा आरती , दुपारी २ ते ५ या वेळेत भागवत कथा प्रवचन , सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ , आणि रात्री ९ ते ११ यावेळेत कीर्तन होणार आहे . भागवत कथेचे प्रवक्ते भागवत महाराज शिरसोलीकर आहेत .
या अखंड हरिनाम सप्ताहात ५ जानेवारीरोजी समाधान महाराज ( रिंगणगाव ) यांचे , ६ जानेवारीरोजी सुधाकर महाराज ( मेहूण ) यांचे , ७ जानेवारीरोजी पुंडलिक महाराज ( चिखली ) , ८ जानेवारीरोजी चिंतामण महाराज ( आडगाव ) यांचे , ९ जानेवारीरोजी विजय महाराज ( रवंजे ) , १० जानेवारीरोजी भागवत महाराज ( शिरसोली ) , ११ जानेवारीरोजी शांताराम महाराज ( शेंदुर्णी ) यांचे कीर्तन होणार आहे . १२ जानेवारीरोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत गोविंद महाराज ( पाचोरा ) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .
विठ्ठल – रुक्मिणी मंदिर संस्थान ट्रस्ट आणि शिरसोलीचे समस्त ग्रामस्थ या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक आहेत .