पारोळा ( प्रतिनिधी ) – नगरपरिषदेच्या दिवंगत सफाई कामगाराच्या मुलाला त्याच्या विवाह सोहळ्यातच अनुकंपा तत्त्वावरील नोकरीवर नेमणुकीचे आदेश त्याच्या हातात देत नगराध्यक्षांनी अनोखी भेट दिली आणि सर्वांनाच सुखद धक्का दिला .
नगरपालिकेत भगवान चौधरी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. कालांतराने त्यांचे निधन झाले. कर्ता पुरुष गेल्याने चौधरी कुटुंबाचा काळाने घात केला कालांतराने त्यांच्या पत्नीचेही निधन झाल्याने त्यांचा मुलगा सतीश चौधरी एकटा पडला. वडिलांचा जागेवर नोकरी मिळावी हे पित्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करावे , या भावनेतून सतीशने नगराध्यक्ष करण पाटील यांची भेट घेतली . त्याची दखल घेत नगराध्यक्ष पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून त्याला विवाहभेटीतच नोकरीचे जॉईन लेटर देऊन त्याचा आनंद द्विगुणित केला व नातेवाईकांना सुखद धक्का दिला. सतीशला कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने नगराध्यक्ष पाटील यांचे चौधरी कुटुंबीयांनी व नातलगांनी आभार मानले.
भगवान चौधरी यांनी पालिकेत काम करत असताना लौकिक मिळवला होता. मात्र अचानक त्यांचे निधन झाले. मुलांना उच्चशिक्षित करून नोकरी मिळावी या आशेने ते काम करीत होते. मात्र त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. पालिकेच्या जागेवर सतीश रुजवावा अशी कुटुंबाची इच्छा होती. योग्य पाठपुरावा होत नसल्यामुळे अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. हे नगराध्यक्ष करण पाटील यांच्या लक्षात चौधरी कुटुंबीयांनी आणून दिले होते . नगराध्यक्ष करण पाटील यांनी पाठपुरावा करून त्याला वडिलांच्या जागेवर शिपाई म्हणून नोकरी दिली. यासाठी मुख्याधिकारी ज्योती पाटील, कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा संदानशिव, लिपिक लांबोळे यांच्या मदतीने पाठपुरावा केला सतीश चौधरी यास लग्न भेटीतच नोकरीचे जॉईन लेटर दिले .खरोखर जाण ठेवून दिलेला शब्द पाळल्यामुळे कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले होते.