भुसावळ ( प्रतिनिधी ) – दीपनगरातील ड्युटी करून दुचाकीने घरी निघालेल्या सुरक्षा रक्षकाचा 35 फूट उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. कैलास शामसिंग पाटील (49, खडका, ता.भुसावळ) यांच्या दुचाकीच्या बाजूने चालणार्या टेम्पो ट्रॅव्हलरचे टायर फुटून पाटील यांच्या अंगावर उडाले व पुलावरून कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांचे सहकारी राहुल दिलीप पाटील जखमी झाले आहेत. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
खडका गावातील रहिवाशी कैलास पाटील दीपनगरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारची रात्र पाळी संपवून ते गुरूवारी सकाळी घराकडे दुचाकीवरून राहुल दिलीप पाटील (35) यांच्यासोबत निघाले मात्र फेकरी उड्डाण पूलावरून वरणगावकडे जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचे चालकाकडील पुढचे टायर फुटले व समोरून येत असलेल्या कैलास पाटील यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.के.2683) वर धडकल्याने कैलास पाटील यांची दुचाकी उड्डाणपुलावर पडली मात्र पाटील हे थेट गाडीवरून पूलावरून खाली फेकले गेले. 35 फुट उंचीच्या पूलावरून पाटील खाली पडल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत बसलेले राहुल दिलीप पाटील (35) हे पुलावरच पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. कैलास पाटील यांच्यावर गुरूवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, सून, जावाई असा परीवार आहे.