एरंडोल ( प्रतिनिधी ) – काल रात्री कासोदा ते आडगाव मार्गावर भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक महिला आणि पुरुष असे अन्य दोन जण जखमी झाले आहेत
जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण अपघातांचे सत्र कायम आहे. जामनेर तालुक्यात लागोपाठ दोन दिवसांमध्ये दोन भीषण अपघात झाले असून या दोन अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
कासोदा ते आडगाव रस्त्यावर एम एच ०८ सी ८४४० क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे तिघे जागीच ठार झाले. बलदीप सुकटा पवार (वय ३२), बबलू बच्चन भोसले (वय २२) आणि गोटू पिंटू चव्हाण (वय १२) अशी या मयताची नावे आहेत . अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
या अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी एरंडोलच्या रूग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.