जळगाव ( प्रतिनिधी ) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन ६, ७, ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येत आहे. यावर्षी एक दिवस वाढवून चार दिवसांचा हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवास जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रायोजकत्व लाभले आहे. या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचप्रमाणे उदयोन्मुख कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे महोत्सवातील प्रत्येक सत्र प्रेक्षणीय व श्रवणीय असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन , जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, भारतीय स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मुकेशकुमार सिंग , युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर गिरिजाभूषण मिश्रा , इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंजली भावे , लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिचे झोनल मॅनेजर अग्रवाल व जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी ७ ते ११ असून कोविड नियमनांच्या अधीन राहून रसिकांना मास्कशिवाय प्रवेश नसून प्रवेशद्वारावर त्यांचे शारीरिक तापमान घेतले जाणार आहे हात सॅनिटाइज केले जाणार आहेत त्यामुळे रसिकांनी ६.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात प्रवेश घेणे अपेक्षीत आहे.
६ जानेवारीरोजी मानसी मोदी व मानसी करानी यांची कथक व भरतनाट्यम जुगलबंदी रंगणार आहे . संदीप चटर्जी यांच्या संतूर वादनात संदीप घोष तबला वादनाची साथ करणार आहेत ७ जानेवारीरोजी मर्मबंधातली ठेव ही … हा नाट्यसंगीताचा विशेष कार्यक्रम वेदश्री ओक , धनंजय म्हसकर , श्रीरंग भावे सादर करणार आहेत त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले , तबला वादनाची धनंजय पुराणिक व व्हायोलिनवर श्रुती भावे साथसंगत करणार आहेत . ८ जानेवारीरोजी पं. विनोदकुमार द्विवेदी यांचे धृपद गायन आणि पं. कुमार बोस व कुणाल पाटील यांची तबला आणि पखवाज जुगलबंदी होणार आहे . ९ जानेवारीरोजी स्निती मिश्रा यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर होईल . त्यानंतरच्या कोकण कन्या बँड या कार्यक्रमातील सहभागी कलाकार अरुंधती तेंडुलकर , आरती सत्यपाल , निकिता घाटे , रसिक बोरकर , स्नेहा आयरे , विशाल सुतार , साक्षी मराठे हे आहेत या कार्यक्रमाचे संगीतकार रविराज कोलथरकर असतील . सूत्र संचालन दीप्ती भागवत करणार आहेत.