जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील शेतकरी सुभाष पाटील यांच्या शेतात महिला कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. या महिलां दुर्गंधी येत असलेल्या दिशेने गेल्यावर तेथे मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.
भातखेडे परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. याच परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने गायी व म्हशीच्या पारडूंना फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. परिसरात बिबट्याचे लहान बछडे देखील आढळुन आले होते. हा त्यांच्यातीलच बिबट्या असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. मृत बिबट्याबाबत सुभाष पाटील यांनी पोलीस पाटील रेखा पाटील यांना सांगितली. पोलीस पाटील रेखा पाटील यांनी खबर एरंडोल वन विभागाला दिली.
एरंडोल वन विभागाचे वनक्षेत्रपाल दत्तात्रेय लोंढे, वनपाल राजकुमार ठाकरे, वनरक्षक शिवाजी माळी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी एरंडोल डॉ. ए. एस. महाजन, पशुसंवर्धन विभागाचे आर. एस. साळुंखे, वासुदेव वंजारी, संजय चौधरी यांनी या मृत बिबट्याचे जागेवरच अंत्यसंस्कार केले.