अपघातस्थळ ते रुग्णालय ; आमदार गिरीश महाजनांची धावपळ
जामनेर ( प्रतिनिधी ) – गारखेड्याजवळ ट्रकने पॅजो रिक्षाला दिलेल्या धडकेतील ठार झालेल्यां तिन्ही मृतांची ओळख पटली आहे . या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जखमी झालेल्या लोकांना वेळेत उपचार मिळावे म्हणून आमदार गिरीश महाजन यांनी केलेली धावपळ महत्वाची ठरली आहे . एस टी चा संप या अपघाताला कारणीभूत आहे म्हणून या दुर्घटनेबद्दल राज्य सरकारच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
आज सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली . एम.एच. १९-६०४५ क्रमांकाचा लाकडाने भरलेला टाटा -४०७ ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. समोरून प्रवाशांनी भरलेली एम.एच.१९ ए.ई.- ९१५८ क्रमांकाची पँजो रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने पॅजो रिक्षाला धडक दिली. या धडकेत दोन जण जागीच ठार झाले तिसर्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आणखी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातामध्ये तानाजी शंकर साळवी ( वय ४७ ,रा. कल्याण); दारासिंग विजयसिंग पाटील ( वय ५० ,रा. नाशिक) आणि शेख आवेश शेख अमिनुद्दीन ( रा. जामनेर) या तिघांचा मृत्यू झाला त्यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले इतरांवर जामनेर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी सहकार्यांसह अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले होते. विजय अशोक धोटे , पार्वताबाई पालवे , कविता पालवे , अलका पालवे , सागर समाधान दोडके , शे. चांद शे.नुरा , विष्णू विजय पालवे , मयूर तानाजी पालवे , भाग्यश्री पालवे , शे.रसूल शे.चांद , अमिनोद्दीन नाजमोद्दीन , मनीष जाधव अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत

आ. गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे की, गारखेडा येथे अपघात एस.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे झालेला आहे. नागरिकांना प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहेत. नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागत आहे. खासगी वाहने देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करत आहेत. सरकारने एस.टी. कर्मचार्यांचा संप संपुष्टात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले असते तर संप मिटला असता, आणि आजचा अपघात देखील झाला नसता. यामुळे सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली आहे. मृत झालेल्यांना राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी देखील आमदार महाजन यांनी केली आहे.
जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांना वेळेत उपचार मिळावे म्हणून आमदार गिरीश महाजन यांनी केलेली धावपळ महत्वाची ठरली आहे . आमदार गिरीश महाजन यांनी रुग्णवाहिका आणि काही सहकाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले . आधी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केले . स्थानिक ग्रामस्थांनीही जखमी आणि मयताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत जखमींना मदत केली . घटनास्थळीच मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटविल्यानांतर पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली . जखमींना जामनेर आणि जळगावच्या रुग्णालयाकडे रवाना केल्यावर अन्य वाहनांमधून मृतांचे मृतदेहही जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . जामनेरच्या रुग्णालयात जातीने उपस्थित राहून आमदार गिरीश महाजन यांनी जखमींच्या उपचारांसाठी प्रयत्न केले आमदार गिरीश महाजन यांच्या या धावपळीमूळेच जखमींना वेळेत दिलासा मिळाला .







