भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळच्या २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे फक्त ट्रेलर आहे . जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आणखी एका मोठ्या प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांना यावे लागणार आहे असे सूतोवाच करीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा राजकीय विश्लेषकांना कामाला लावले आहे .
या नगरसेवकांचा प्रवेश सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की , ४० वर्षे काम केलेल्या नाथाभाऊंना भाजप झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार ? , या कार्यकर्त्यांच्या सामान्य प्रतिक्रिया आहेत . भुसावळच्या २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे फक्त ट्रेलर आहे . जिल्ह्याचे प्रश्न सुटले पाहिजेत . भुसावळला बऱ्यापैकी निधी मिळतो आहे . पक्ष विस्तारासाठी कार्यकर्त्यांना विकासाचे बळ देण्याची आवश्यकता आहे . भुसावळच्या अनेक समस्या आज मांडल्या गेल्या या शहरातील ६ हज्जार पेक्षा जास्त अतिक्रमणधारक घरांपासून वंचित आहेत . असा सगळा विचार करून नव्यांना बळ आणि जुन्यांना साथ दिली गेली पाहिजे , असेही ते म्हणाले .