जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील विविध कामांसाठी दिलेला निधी खर्च होण्याबाबत काही अडचणी लक्षात आल्या असल्या तरी त्यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांना मुंबईत बोलावून घेउ आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेउ असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले .
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की , आज जळगावात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . नियोजन विभागाचा निधी , आमदार निधी , सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभाग व विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला गेला . सुरु असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती घेतली . कामाबद्दल अडचणी कशा येतात आणि त्यावर काय करावे यावर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली . अधिकाऱ्यांना काही निर्णय घेता येत नसतील तर असे का होते ? , यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने आढावा घेतला गेला . जिल्ह्यातील विविध कामांसाठी दिलेला निधी खर्च होण्याबाबत काही अडचणी लक्षात आल्या असल्या तरी त्यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांना मुंबईत बोलावून घेउ आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेउत , असेही ते म्हणाले .
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की , या जिल्ह्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवरही चर्चा झाली . तिसरी लाट आली तर काय तयारी आहे ? , व्यवस्था कशी आहे ? , याची माहिती मी अधिकाऱ्यांकडून घेतली.