जळगाव ( प्रतिनिधी ) – कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू असतांना पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील जोगे तांडा येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील भोजू बंद्री राठोड यांच्याशी ८ मे २०११ रोजी झाला लग्न झाल्यानंतर हे पती पत्नी जैन कंपनीत कामाला होते त्यानंतर पती – पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई २० मार्च २०१९ रोजी मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या. प्रतिभाबाई यांनी केलेल्या कामांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होता.
दरम्यान पती भोजू राठोड याने ७ एप्रिल २०२० ते ८ जुलै २०२० दरम्यान, पत्नीच्या नावाच्या बनावट सह्या करून वेळोवेळी त्यांच्या खात्यातून ६२ हजार ४०० रूपये काढून घेतले. विवाहिता माहेरहून पैसे काढण्यासाठी जैन कंपनीसमोर असलेल्या एका बँकेत आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे समोर आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांचे पती भोजू राठोड याने त्यांच्या नावाच्या बनावट सह्या करून परस्पर पैस काढल्याचा प्रकार समोर आला. या विवाहितेने मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भोजू राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहेत .