जळगाव : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी अत्यावश्याक सेवा, तसेच सेवेशी संबंधित आस्थापना तसेच वाहनांना परवानगी आहे. मात्र कुठलेही आदेश नसतांना विनाकारण प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन दिवसात १०० पेक्षा रिक्षांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. तसेच या सर्व रिक्षा शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध चौकांमध्ये कारवाई
लॉकडाऊन काळात रिक्षात प्रवासी वाहतूक करण्यास बंदी आहे. या पाश्वभूमीवर विनाकारण प्रवासी वाहतूक करुन गर्दी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे फिरते पथक नेमण्यात आले आहे. या पथकासह पोलीस निरिक्षक दिवसभर शहरात गस्त घालीत असतात. यादरम्यान सुभाष चौक, कोर्ट चौक, ला.ना.चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक या ठिकाणांहून प्रवासी वाहतूक करताना रिक्षा आढळून आल्या. संबंधित रिक्षांवर कारवाई करुन अशा १०० पेक्षा जास्त रिक्षा वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन घेवून संबंधित रिक्षाचालकांकडून दंड वसूल करावा, की गुन्हा दाखल करावा, याबाबत शहर वाहतूक शाखेचे कारवाई सुरु होती.
१८ रिक्षांवर कारवाई
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकातर्फे गुरुवारी शहरांत प्रवासी वाहतूक करतांना १८ ऑटो रिक्षा आढळून आल्या. सदर रिक्षा एस. टी. वर्क शॉप व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे जमा करुन ठेवण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरिक्षक राठोड, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक आव्हाड यांच्या पथकाने केली.