भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोरटेक बुद येथील माहेर असलेल्या विवाहितेला मुलगी झाली , लग्नात मान दिला नाही आणि माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी गांजपाठ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोरटेक येथील मनीषा यशवंत पाटील यांचा विवाह 2016 मध्ये चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील यशवंत भाऊसाहेब पाटील यांच्यासोबत झाला. लग्न झाल्याच्या ४ महिन्यापर्यंत विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला शिवीगाळ करणे, टोमणे मारणे सुरु झाले. लग्नात तुझ्या आई-वडिलांनी मान दिला नाही, तुला मुलगी झाली आणि तुझ्या वडिलांनी लग्नात अंगावर कमी सोने चढवले असे बोलून विवाहितेला तीन लाख रुपये आणावे अशी मागणी पती यशवंत पाटील याने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पती, सासू, सासरे नणंद आणि नंदोई यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. गावचा पोलीस पाटील असल्याने मला कोणीच काही करू शकत नाही अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे माहेरी निघून आल्या. भडगाव पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती यशवंत पाटील, सासू सुशिलाबाई पाटील, सासरे भाऊसाहेब पाटील, नणंद वैशाली पाटील, नंदोई योगेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स फौ छबुलाल नागरे करीत आहेत .







