जळगाव ( प्रतिनिधी ) – काहीही समाधानकारक खुलासा न करता बेकायदेशीरपणे नोकरीतून काढून टाकण्याच्या अन्यायाची कुणीच दखल घेत नाही , असा आरोप करीत अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील आदर्श हायस्कुल या शाळेतील माजी शिक्षक संदीप शिरसाठ यांनी आता जिल्हा परिषदेसमोर पत्नीसह उपोषण सुरु केले आहे.
संदीप शिरसाठ यांनी सांगितले की , या संस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत . जागा रिक्त नसताना माझ्या नन्तर रुजू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रीतसर पदांच्या मान्यता मिळाल्या आहेत . मी अनेक वेळ पाठपुरावा करून माझ्या मागणीचा विचार कुणीच करीत नाही . मी नव्याने रुजू झालो असल्याने आधी संस्थेने काय केले त्याची मला माहिती नाही असे मुख्याध्यापक सांगतात . शिक्षणाधिकारी या संस्थेच्या चुकांना पाठीशी घालत असल्याचा आता संशय येतो आहे . त्यामुळे आताच्या उपोषणातून काही फलनिष्पत्ती ना झाल्यास आता मला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करावे लागणार आहे.