जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ ते जळगाव दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत ११ ऑक्टोबररोजी आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा आज मृत्यू झाला आहे . रेल्वे आणि नशिराबाद पोलिसांनी या मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे .
हा अनोळखी वृद्ध जळगाव रेल्वे स्थानकाजवळच्या खांब क्रमांक ४२० / २७ जवळ गंभीर जखमी अवस्थेत ११ ऑक्टोबररोजी आढळला होता त्याला पोलिसांनी आधी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नन्तर गोदावरी महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते . उपचार सुरु असताना त्याचे १७ ऑक्टोबररोजी निधन झाले अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कुणीच पुढे न आल्याने पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे .
भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या अनोळखी वृद्धाचे वय अंदाजे ६० वर्षे व उंची ५ फूट २ इंच आहे . गव्हाळ रंग आणि सडपातळ शरीरयष्टी असून अंगात पांढऱ्या बदामी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट त्याखाली हाफ बाह्यांचे निळे बनियान , खाकी रंगाची फुल पॅन्ट व लाल रंगाची अंडरपँट नेसलेली आहे . उजव्या हाताच्या मनगटावर लाल -पिवळ्या रंगाचा धागा बांधलेला आहे . या व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास किंवा नातेवाईकांनी जळगावच्या रेल्वे पोलीस चौकीत सहाय्यक उप निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याशी ( ९८२३५३७३६७ ) संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले आहे .