मुंबई (वृत्तसंस्था) – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या तक्रारीवरून अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरणी अर्णब गोस्वामीने केलेलं वक्तव्य हे देशातील जातीयवादी भावना भडकावून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नितीन राऊत यांच्यासह राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश राऊत यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलिसांना दिले होते. ज्यानंतर गोस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्र, जातीय भावना भडकविणे, बदनामी व अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अर्णब गोस्वामी विरुद्ध त्वरित कारवाई व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची काँग्रेस नेत्यांनी माहिती दिली.