मुंबई ( प्रतिनिधी ) – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता या आगामी निवडणुका स्थगित केल्या आहेत.
राज्यात १०६ नगरपंचायतींमधील ४०० जागांवर निवडणुका होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर पेचानंतर या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १,८०२ पैकी ३३७ जागांवर ओबीसी आरक्षण आहे.
याशिवाय भंडारा नगरपरिषदेत ५२ जागांवर निवडणूक होत आहे. त्यातील १३ जागा ओबीसी राखीव आहेत. त्यालाही स्थगिती मिळाली आहे. गोंदियातील जिल्हा परिषदेत ५३ पैकी १० ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित आहेत. पंचायत समितीत ४५ ओबीसी जागा आणि महानगरपालिकेची १ जागा यांच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली.
राज्यातील ५ हजार ४५४ ग्रामपंचायतींपैकी ७,१३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातही ओबीसी राखीव जागांची निवडणूक स्थगित होणार आहे.