पुणे ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात पिस्तूल परवान्यासाठीच्या मागणीत वाढ होत आहे. पिस्तूल परवाना मिळवण्यासाठीही अनेकजण धडपड करत आहेत. पिस्तुल परवाना मिळावा यासाठी थेट स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याची चर्चा रंगली आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एका उत्साही सरपंचावर काही महिन्यापूर्वी रस्त्यावर खुनी हल्ला झाल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल झाली होती. सरपंच स्वतःच्या चारचाकी वाहनाने रात्री घरी परतत होता. अचानक समोरुन दोन दुचाकीवर चौघेजण आले. त्यांनी चाराचाकी वाहनाला दुचाकी आडव्या लावल्या. त्यानंतर दगडाने चारचाकीच्या काचा फोडता त्यांनी पिस्तुल सरपंचावर रोखले . मात्र सरपंचाने चारचाकी वेगात पळवत स्वतःचा जीव वाचावला. असे त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अज्ञातांनी सरपंचावर हल्ला केला. मात्र यात सरपंचाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यांना साधे खरचटलेही नाही. हल्लेखोर फक्त काच फोडून शांतपणे निघून गेले का? रात्री दहा वाजता घटना घडली मात्र जवळ लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी ही वाहने पाहिली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले अडीच महिने तपास केला मात्र पोलिसांना संशयास्पद काहीच मिळून आलेले नाही. त्याबाबत पोलीस काही सांगत नाहीत. जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा कथित बनाव केला होता. असे लोक तेव्हापासून आतापर्यंत बोलत आहेत. सरपंचाने काही दिवसांपूर्वी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता. सहज परवाना मिळावा यासाठी सरपंचानेच हा बनाव रचल्याची चर्चा दबक्या आवाजात गावात आहे.
प्रकार घडण्यापूर्वी तक्रारदाराचा पिस्तुल परवाण्यासाठी अर्ज दाखल असल्याचे समजते. अशी माहिती खेडचे पो नि सतिश गुरव यांनी दिली.