चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघातात तीन मृत्युमुखी ; अकरा जखमी
आ. चव्हाणांसह पोलीस, नागरिकांचे मदतकार्य सुरू
जळगाव (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे येत असलेल्या कामगारांच्या क्रुझर वाहनाला चाळीसगाव तालुक्यात हिरापूरजवळ भीषण अपघात झाला. क्रुझर वाहन पलटी होऊन त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. इतर जखमींना चाळीसगाव मधील विविध खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व पोलीस उपस्थित असून मदत कार्य सुरू आहे.
क्रुझर वाहन क्रमांक (एम एच १३- ५६०४) यामधून कामगार बांधव मनमाड येथे गेले होते. तेथून रात्री ९ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे येण्यासाठी निघाले. मात्र नियतीला वेगळेच मंजूर होते. चाळीसगाव तालुक्यात हिरापूर गावा जवळ आले असताना अचानक त्यांचे क्रुझर वाहन पलटी झाले. दिवसभरात पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. तसेच काही ठिकाणच्या साईड पट्ट्या खचले आहेत. यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहन पलटी झाल्यामुळे त्यातील ३ जण जागीच ठार झाल्याचे दिसून आले आहे तर उर्वरित ११ जणांना विविध खासगी रुग्णालयात तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी हलविले आहे. वाहनांमध्ये एकूण १४ जण असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे. चाळीसगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान कामगारांच्या कुटुंबावर काळाचा घाला झाल्यामुळे पाचोरा, चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
दरम्यान जखमी ११जणांमध्ये २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत आहे. जखमींमध्ये कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी सर्व रा. डोंगरगाव ता. पाचोरा यांचा समावेश आहे.
“चाळीसगांव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ डोंगरगाव येथील मजुरांना घेऊन जाणारी क्रूझर गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झालो. वाहनातील ३ मजूर मयत झाले असल्याचे कळाले, इतर प्रवाश्यांना नागरिकांच्या मदतीने चाळीसगांव शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केले असून २ गंभीर रुग्णांना धुळे येथे रवाना केले.
अपघातग्रस्तांच्या घरच्यांशी संपर्क साधला गेला असून मीदेखील परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे. सदर अपघातात मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व जखमींच्या तब्बेतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना.”
– आमदार मंगेश चव्हाण