जळगाव ( प्रतिनिधी ) – रेल्वेत हृदयविकाराचा झटका आल्याने सुरतच्या प्रवाशाचे जळगावात निधन झाल्याची घटना आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनवर घडली .

सुरतचे रहिवाशी लक्ष्मीचंद जेठानी ( वय ७१ ) हे त्यांची मुलगी सपना आसानी यांच्यासोबत सुरतेहून २८ नोव्हेंबर रोजी जळगावात त्यांच्या साडूच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते , मोहाडी रोड जळगाव येथे हा लग्नसोहळा ३० नोव्हेंबर रोजी आटोपल्यानंतर आज ते दोघे परत सुरतला जाण्यासाठी निघाले होते . जळगाव रेल्वे स्थानकात ते तापतीगंगा एक्सप्रेस डी २ क्रमांकाच्या डब्यात मध्ये बसले . या डब्यात प्रचंड गर्दी होती . ही रेल्वे सकाळी साडे दहा वाजता जळगाव स्थानकातून निघाली आणि काही वेळातच लक्ष्मीचंद जेठानी यांना अस्वस्थ वाटू लागले , त्यातच हृदयविकाराचा झटका आला . सहप्रवाशांनी चैन ओढून रेल्वे थांबवली . नंतर जी आर पी पोलिसांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . तेथे सी एम.ओ.डॉ.एन डी महाजन यांनी त्यांना मृत घोषित केले . आता अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव सुरतला त्यांचे नातेवाईक घेऊ जाणार आहेत. त्याच्या पच्छात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.







