जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षकाची कमतरता दिसून येत असल्याचा अनुभव रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी यांना येत आहे. आताचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाऊराव नाखले हे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र त्यांनी राजीनामा दिलेला नाही. तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाशी तीन वर्षाचा केलेला करार वर्षभरापूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडूनदेखील अतिरिक्त शल्यचिकित्सकाची नेमणूक करण्यात अडचण निर्माण झाली आहे. या रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षकच मिळेना झाले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कारभार आता “रामभरोसे” सुरु असल्याची प्रतिक्रिया अधिकारी, कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

सामान्य व गरीब रुग्णांसाठी उपचारासाठी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा एकमेव आधार आहे. रुग्णांच्या समस्या सोडविणे, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावणे यांसह संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांची असते. त्यातच आता अहमदनगर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांची राहील असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आयुक्तांनी काढले आहे. जळगाव रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्याने हा कार्यभार वारंवार अतिरिक्त म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखांकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे गेल्या दीड वर्षात तब्बल चार वैद्यकीय अधीक्षक बदलले आहे. सध्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे.
नगरच्या घटनेनंतर काढण्यात आलेल्या आयुक्तांच्या आदेशाला त्यांनी विरोध करत पद सांभाळण्यास नकार दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाशी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केलेला तीन महिन्यांचा करार नोव्हेबर २०२० ला मागील वर्षी संपला आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडूनदेखील अतिरिक्त शल्यचिकित्सक देण्यास अडचण निर्माण झाली आहे. तर दोन महिन्यातच डॉ. नाखले देखील कार्यभार सांभाळण्यास नकार देत असल्याने जीएमसीला वैद्यकीय अधीक्षकच मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मात्र अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील हे १७ दिवसांच्या सुट्ट्यांवर गेले असल्याने रुग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.







