जळगाव (प्रतिनिधी) – एकलग्नजवळ ट्रकच्या धडकेत आज एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ५ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला आहे त्यामुळे त्याच्या परिवारावर संकट कोसळले आहे.

हरसिंग भिला राठोड (वय ३५ , रा. सारवातांडा ता. पारोळा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जळगावहून तो घरी सारवातांडा येथे जोडीदारासोबत निघाला होता. संध्याकाळी एकलग्न गावाजवळ गुजरातकडील एका ट्रकने मागून त्याला धडक दिली. त्यात दुचाकीवरील ते दोघे खाली पडले. यात हरसिंग राठोड व त्याचा जोडीदार जखमी झाला होता. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले हरसिंग राठोड यांना तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी मृत घोषित केले.
हरसिंग राठोड यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, 5 दिवसांपूर्वी जन्मलेला मुलगा असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी हरसिंगने त्याच्या मुलासाठी खेळणी, कपडे खरेदी करून आणले होते. त्याने पाहिलेले सुखी संसाराचे स्वप्न अपघाताने कोलमडले . त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







