पाचोरा ( प्रतिनिधी ) – राज्यात व खांदेशात अनेक लोककला लोकप्रिय आहेत. केवळ खांदेशातच साजऱ्या होणाऱ्या कानुबाई उत्सवाच्या वेळेस गायल्या जाणाऱ्या वहिगायन या लोककलेला राजमान्यता मिळावी अशी अपेक्षा विनोद ढगे यांनी व्यक्त केली. नगरदेवळ्यात वहिगायन कलावंतांच्या मेळाव्यात ते बोलत होते .
नगरदेवळा येथे लोककलावंत विकास परिषद ( जळगांव ) व साई शक्ती वही मंडळ,( नगरदेवळा) आयोजित खांदेशातील वहिगायन लोककलावंतांचा विभागीय १५ वा मेळावा काल शेकडो लोककलावंतांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते . प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील , सरपंच सौ.प्रतिक्षा काटकर, स्वागताध्यक्ष लोकशाहीर शिवाजीराव पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे जळगांव जिल्हाध्यक्ष विनोद ढगे उपस्थित होते.
शाहीर शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी लोककलावंतांच्या समस्यांना शासन स्तरावर नक्कीच मांडले जाईल व वहिगायन या कलाप्रकारास राजमान्यता मिळवून देऊन पाचोरा येथे तालुक्यातील लोककलावंतांच्या येण्याजाण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून लोककलाभवन निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले.
लोककलेच्या राष्ट्रीय निवड समितीवर कार्यरत नगरदेवळा येथील शाहीर शिवाजी पाटील यांचे घर पावसात पडून ते बेघर झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. शाहीर शिवाजी पाटील यांचे घर शासकीय किंवा मित्रपरिवाराच्या मदतीतून लवकरच बांधून देऊ असा विश्वास आमदार पाटील यांनी दिला. सरपंच सौ.काटकर यांनी वहिगायनामुळेच कानबाई उत्सवात रंगत निर्माण होते असे सांगितले .दिवसभराच्या या कार्यक्रमास उपस्थित वहिगायन मंडळांनी कला सादर केल्या प्रत्येक मंडळास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन संजीव बावसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर महाजन , दिपक पाटील, किरण पाटील, भरत चौधरी , गोरख महाजन , शुभम शेलार , गजानन तावडे, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, कैलास महाजन , भागवत महाजन , बबलू महाजन , सागर पाटील, संतोष महाजन , सीताराम महाजन यांनी परिश्रम घेतले .