जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांच्या विवाहप्रित्यर्थ जिल्ह्यात ४ मंत्र्यांचे आगमन होणार असून मुख्यालय न सोडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरकारी विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम आणि चोपडा तालुक्यातील सनपुले येथील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा यांचा विवाह पाळधी ता. धरणगाव येथील साईबाबा मंदिर परिसरात संध्याकाळी ७.३० वाजता संपन्न होत आहे. त्यानिमित्त राज्यातील विविध मंत्री जळगावात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ वाजता जैन हिल्स येथील हेलीपेड येथे उतरतील. तेथून पाळधीला गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमाला रवाना होतील. तेथे उपस्थिती दिल्यावर दुपारी ३ वाजता लगेच जैन हिल्स येथील हेलीपेड येथूनच पुढील दौऱ्यावर जातील. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ४ वाजता जळगाव विमानतळावर उतरतील. तेथून ते गुलाबराव पाटील यांच्याकडील विवाह सोहळ्याला रवाना होतील. त्यानंतर ५.३० वाजता परत विमानाने मुंबईकडे जातील.
राज्याचे कौशल्य विकास, रोजगार व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे ५.४० वाजता जळगाव विमानतळावर उतरतील. त्यानंतर ७.३० वाजता पाळधी येथील गुलाबराव पाटील यांच्याकडील विवाह कार्यक्रमाला उपस्थिती देतील. रात्री ९.३० वाजता विमानतळावरून मुंबईला जातील. तर कृषिमंत्री दादा भुसे हे ४.३० वाजता मालेगाव जि. नाशिक येथून पाळधी येथे येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडील विवाह कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यावर ९.५० वाजता सेवाग्राम एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना होतील.
पालकमंत्र्यांच्या पोराचे लग्न , ४ मंत्री जिल्ह्यात ; मुख्यालये सोडू नका , जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना !