मुंबई ( प्रतिनिधी ) – एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून आज पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांमध्ये एसटी कामगारांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. सातवा वेतन आयोगाबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीसोबत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. अनिल परब यांनी आवाहन केल्यानंतर संयुक्त कृती समिती चर्चेसाठी तयार झाली आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत फक्त सातवा वेतन आयोग लागू करण्यावर चर्चा होत आहे. या चर्चेत विलीनीकरणाचा मुद्दा नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे विलीनीकरणाऐवजी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रश्न निकाली निघाल्यास कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
परब यांनी पुन्हा एकदा कामगारांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायलयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं, असं आवाहन परब यांनी केलं आहे.