जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधानातून नागरिकांना तसाच समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला. संविधान आहे, म्हणून आज आपण एकजूट आहोत. प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या विचारांवरून चालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. संविधान जागर समितीतर्फे संविधान दिनानिमित्त आयोजीत संविधान जागर रॅलीचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
संविधान जागर समितीतर्फे आज संविधान दिनानिमित्त रेल्वे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी महापौर सीमा भोळे, मुकुंद सपकाळे, फारूक शेख, माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादीचे एजाज मलीक, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, अमोल कोल्हे, माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे आदीची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांचे पुष्प गुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. मुकुंद सपकाळे यांनी प्रास्ताविक केले
पालकमंत्री म्हणाले की, संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही. देशातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी याची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. सर्वांना न्याय देण्याचे काम संविधानाने केले आहे. आम्ही ओबीसी नसतो तर आज या व्यासपीठावर नसतो. अलीकडच्या काळात संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली जाते, मात्र देशातील दलीत, ओबीसी, आदिवासी आदींच्या एकत्रीत संख्येमुळे असे काहीही शक्य नाही.आजही संविधानाच्या नियमाच्या बाहेर कुणाला जात येत नाही. आम्ही गाडीत बसलो असलो तरी या गाडीचे स्टीअरिंग हे बाबासाहेबांच्या (संविधानात) हातात आहे. आता अनेक जण गणपती पाण्यात बुडवून सत्ता बदल होण्याची अपेक्षा करत असले तरी तसे होणार नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला. देशात इतक्या जाती-धर्म असले तरी आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, आणि यानुसारच आपण वागले पाहिजे असे आपल्याला संविधान सांगते. असे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हरीचंद्र तायडे यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संविधान जागर रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, टॉवर चौक मार्गे जुन्या बस स्थानक परिसरात आली. येथून तायडे गल्ली मार्गे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संविधानाचा जयजयकार करणार्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.