मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे सोनू निगम दुबईमध्ये अडकून पडला आहे. आपल्या परिवारासह तो दुबईला गेला असतानाच लॉकडाऊन जाहीर झाले आणि आता तो भारतात परत येऊ शकत नाही आहे. स्वतः सोनू निगमनेच सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. दुबईतल्या लोकांनी आता सोनू निगमच्या अटकेची मागणी करायला सुरुवात केली आहे. त्याचे कारण वेगळेच आहे. तीन वर्षांपूर्वी सोनूने अजानच्या आवाजाबाबत ट्विट केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादावर सोनूने आपल्या भाषेत प्रत्युत्तरही दिले होते. भारतात धार्मिक स्वातंत्र्यामुळे जी दडपशाही येते आहे, ती नष्ट व्हायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. या वादाला वैतागून त्याने आपले ट्विटर अकाउंट डिलीट देखील करून टाकले होते. सेलिब्रिटींपैकी काहींनी त्याचे समर्थन केले होते. तर काहींनी टीकाही केली होती. आता दुबईमध्ये अडकला असताना सोनू निगमला अजानच्या आवाजाचा त्रास होत नाही का ? असे विचारून तीन वर्षांपूर्वीच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल व्हायला लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सोनू निगमपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.








