जळगाव ( प्रतिनिधी ) – वावडदा गावात कायमची दारूबंदी झालीच पाहिजे या मागणीसाठी आज पुन्हा महिलांनी आक्रमक भूमिका कायम असल्याचे दाखवून दिले . ४०० महिलांच्या उपस्थितीत या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.
गेल्या १५ दिवसांपासून वावडदा गावातील विनापरवाना दारू विक्री चर्चेत आहे . आज पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील महिलांनी अंगावर शहारे आणणाऱ्या व्यथा जाहीरपणे मांडल्या . आधी ३ दिवस दारूबंदी होती तेंव्हा गावातील एकाने ड्रमभर दारू तयार करण्याची हिम्मत केलीच कशी ? हा प्रश्न सर्वांना निरुत्तर करणारा ठरला . यापुढे गावात कुणी बेकायदा दारू तयार करताना किंवा विक्री करताना सापडला तर आता आम्ही महिलाच त्याच्या घरावर हल्ला करू , त्याचा संसार रस्त्यावर मांडू , एवढे करूनही काहीच फरक पडत नसेल तर ग्रामपंचायत कार्यालयावर चाल करून जाऊ , असा निर्वाणीचा इशारा या महिलांनी आज दिला.
अत्यंत त्वेषाने या सगळ्याच महिला दारूबंदीसाठी बारीकसारीक माहिती पोटतिडकीने सांगत असताना एका वृद्ध महिलेची व्यथा मन सुन्न करणारी ठरली . आपला नवरा आणि कर्त्या मुलाचा मृत्यू दारूच्या व्यसनाने झाला , त्याच्या तीन मुलांना म्हणजे नातवंडांना मी सांभाळते आहे , त्यांचे पालनपोषण करीत एका नातीचे लग्न मी करून दिले …. माझ्यासारख्या म्हाताऱ्या व्यक्तीला घर – संसार सांभाळण्यासाठी अशा जिवाच्या अवकळा कराव्या लागतात , हे त्या वृद्धेचे शब्द काळजाला चिरे पाडत होते !
काही दिवसांपूर्वी दारुड्याने मोटारसायकलची धडक दिल्याने या गावातील ८ महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता . त्या घटनेनंतर या महिला संतप्त आहेत आज दारूबंदीचा ठराव मंजूर झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले असले तरी प्रशासनाचे त्यांना नेहमी सहकार्य मिळणे महत्वाचे आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सर्वांची मान शरमेने खाली जावी असा महिलांसाठी या गावात सार्वजनिक स्वच्छतागृहच नसल्याचा मुद्दाही या सभेत महिलांनी आवर्जून मांडला . ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि विकासकामांच्या दृष्टिकोनावर या प्रश्नाने बोट ठेवले गेले असल्याने ग्रामस्थ पुरुषांना काय उत्तर द्यावे हेच सुचेनासे झाले होते.
सरपंच राजेंद्र वाडेकर , उपसरपंच कमलाकर पाटील ,एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले , पो कॉ प्रदीप पाटील , ग्रामसेवक मोचे अप्पा , पोलीस पाटील विनोद गोपाळ , सामाजिक कार्यकर्ते संतोष कापडणे , सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.