बीड ( वृत्तसंस्था ) – मूळचा बीड येथील रहिवाशी तरुण एका गुन्ह्यात मध्य प्रदेशातील कारागृहात आहे. मात्र कारागृहातूनच त्याने विविध देशांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. त्याला सुविधा कुणी उपलब्ध करून दिल्या ? , याचा तपास सुरु आहे .
कारागृह प्रशासनातील दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून जबरदस्तीने हे काम करवून घेतल्याचा आरोप या गुन्हेगाराने जबाबात नोंदवला आहे. हवालाच्या माध्यमातून फसवणुकीचे पैसे वळवल्याचे समोर आले आहे. याची व्याप्ती मोठी असून अनेकांची चौकशी सुरु आहे. मध्यप्रदेश सायबर पोलीस सध्या तपास करीत आहेत.
बीड येथील रहिवासी असलेला अमर अनंत अग्रवाल हा तरुण फेब्रुवारी 2018 पासून फसवणुकीच्या प्रकरणात भैरवगड कारागृहात बंदी होता. हॅकर असल्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याला लॅपटॉप आणि काही क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले. त्याद्वारे त्याने अनेकांची खाती हॅक करून पैशांची अफरातफर केली. अनेक पंचचारांकित हॉटेलांनाही त्याने अशा प्रकारे गंडा घातला.
या गुन्हेगाराने पाच देशांतील हॉटेल, नागरिक तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. अमरच्या आरोपानंतर आता तत्कालीन कारागृह अधीक्षक संतोष लडिया, सहाय्यक कारागृह अधीक्षक सुरेश गोयल व काही कर्मचाऱ्यांची मध्य प्रदेश सायबर सेलकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमरला आता भोपाळच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.
अमर अग्रवाल याने ऑनलाइन गंडा घालून हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवले. यात काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही अमरने स्वतः फिरवले आहेत. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा पोलिसांना संशय आहे. या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. पुण्यातील दोघांचीही चौकशी करण्यात आली आहे.