मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
शरद पवार यांची अनिल परबांसोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असल्याचं समजतं.
वरळीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असून त्यात संपाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. संपामुळे कामगारांचं निलंबन आणि सेवासमाप्तीसारखी कारवाई देखील सरकारनं केली आहे. त्यानंतरही कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. रविवारी धुळे येथून निघालेल्या चार बसेस फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळं पेच वाढला आहे.