पाठिंबा देणाऱ्याच उमेदवार विजयी !
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे .
जिल्हा बँक संचालक मंडळाची ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच अनेक कारणांनी राज्यात गाजते आहे . सर्वपक्षीय पॅनलच्या तयारीला अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने लावलेला ‘ अधीकृत ‘ सुरुंग हा त्यातील गाजलेल्या मुद्द्यांपैकी एक ! . भाजप उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले जाणे आणि याच गदारोळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सही करू देण्यासाठी ५० हजारांची मागणी केल्याचा अत्तरदे दाम्पत्याने केलेला जाहीर आरोपही असाच गाजला . याच गदारोळात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अचानक भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता . दुसरीकडे पक्षाने अधिकृतपणे बहिष्काराची घोषणा केली असली तरी काही मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले आणि त्यापैकी भुसावळचे आमदार संजय सावकारे निवडूनही आले ! राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी तर हा मुद्दा जाहीरपणे उपस्थित केला होता की भाजपचा निवडणुकीवर बहिष्कार असेल तर त्यांचे काही उमेदवार निवडणूक का लढवत आहेत ?
आता या निवडणुकीच्या सगळ्या निकालांपैकी रावेरचा निकाल असाच सगळ्यांना विचारात टाकणारा ठरला आहे . अनेक राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत पाठिंबा जाहीरपणे देणारा उमेदवार ज्याला पाठिंबा दिला त्याचाच पराभव करून निवडून यावा , असा हा राजकारणातील ‘ खान्देशी तडका ‘ आता राज्यभरात चर्चेचा मुद्दा ठरला आहे . माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या जनाबाई महाजन विजयी झाल्या . विशेष म्हणजे माजी आमदार अरुण पाटील यांना २५ आणि जनाबाई महाजन यांना २६ मते मिळाली ! अरुण पाटील यांचा ‘गेम ‘ कुणी आणि कसा केला याचा काथ्याकूट करण्यात आता विश्लेषक लागले आहेत !