जळगाव (प्रतिनिधी) – येथील चौगुले प्लॉट परिसरातील सलून व्यवसायिक सुनील सुरेश टेमकर (वय ३६) याची अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना रविवार दि २१ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.दरम्यान याप्रकरणी जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनचे पो.नि.बळीराम हिरे तपास करीत आहेत.
जळगाव ते ममुराबाद रस्त्यावर प्रजापत नगर येथील राहणारा छत्तीस वर्षीय तरुण सुनील सुरेश टेमकर यांचे चौगुले प्लॉट परिसरात दाढी – कटिंगचे दुकान आहे. काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्होती म्हणून काही दिवस सलूनचे दुकान बंद होते.
रविवारी त्याने दुकान उघडून व्यवसाय पुन्हा सुरू केला होता. आज रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी अवस्थेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत सुरेश टेमकरच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.







