वेलिंगटन (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घेतले आहे. अशातच एका देशाला करोनाला हरविण्यात यश आले आहे. न्यूझीलंड हा करोनाला हद्दपार करणारा पहिला देश ठरला आहे.ऑकलँड विश्वविद्यालयाचे वॅक्सीन विशेषज्ञ हेलेन पेटूसिस-हैरिस यांनी म्हंटले कि, करोनाला हरविण्यासाठी त्याचे संक्रमण (ट्रान्समिशन) रोखणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा विषाणू आपोआप संपेल, असे त्यांनी सांगितले आहे.
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या जवळपास ५० लाख असून ब्रिटनएवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. यामुळे येथे सोशल डिस्टेंसिंग पाळणे संभव होते. याशिवाय न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या निर्णय आणि कठोर अंमलबजावणीसमोर करोना व्हायरसने हार मानली आहे.
न्यूझीलंडमध्ये मार्चच्या शेवटास १०० करोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर दिवसागणिक ९० करोनाग्रस्त रुग्ण समोर येण्यास सुरुवात झाली. मात्र, आता ही संख्या कमी होऊन मंगळवारी केवळ ५ रुग्ण आहेत. याशिवाय न्यूझीलंडमध्ये करोना व्हायरसमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
याविषयी बोलताना जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या कि, २० मार्चपासून परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. येथे जर कोणी बाहेरून देशात आला तर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे केल्याने हा आजार बर्याच अंशी नियंत्रित झाला आहे. दरम्यान, न्यूझीलंड सरकार लॉकडाऊन उठविण्याच्या कोणतीही घाई करताना दिसत नाही.