जळगाव ( प्रतिनिधी ) – एस टी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडल्या असल्या तरी जळगाव आगाराच्या एका आणि धुळ्यात ४ बसेसवर दगडफेक झाल्याने आज रुजू झालेले एस टी चे नवे कर्मचारी दगडफेकीमुळे संभ्रमात पडले आहेत .
चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली . धुळे आगारातून बाहेर जात असलेल्या चार बसेसवरही अज्ञात लोकांनी अशीच दगडफेक केली. या घटनेमुळे सामान्य जनतेतही राज्य सरकारच्या एस टी कर्मचाऱ्यांविषयीच्या उदासीनतेच्या भूमिकेबद्दल रोष वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अज्ञात लोकांनी यापुढेही अशीच दगडफेक करणे सुरु ठेवले तर आम्ही काम कसे करायचे ? , असा प्रश्न हे नवे कर्मचारी आता प्रशासनाला विचारत आहेत . अगदी प्रत्येक बसला संरक्षण देणे पोलिसांनाही शक्य नाही . त्यामुळे उद्या कामावर जळगाव आगारात यापैकी किती लोक पुन्हा हजर होतात त्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उद्याची बसेसच्या फेऱ्यांची संख्या अवलंबून राहणार आहे . चालक आणि वाहक नव्याने रुजू करून घेतले आहेत त्यांना मार्गावरील थांबे आणि रस्त्यांची परिस्थिती नेहमी धावणाऱ्या चालकांसारखी माहिती नाही . आधीच सुरळीत प्रवासाबद्दल साशंकता असल्याने प्रवाशांची संख्या खालावली आहे . या सगळ्या परिस्थितीचा विचार करून एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बस सेवा सुरळीत करण्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे .
आज नव्याने रुजू करून घेतलेल्या चालक आणि वाहकांना तात्पुरते म्हणजे एका महिन्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे गरज असेल तेंव्हा कामावर यावे असे या नियुक्तीचे स्वरूप आहे आणि फक्त ४६१ रुपये ६१ पैसे प्रतिदिन रोजंदारी त्यांना देण्यात येणार आहे आधीच अशी अस्थिर मानसिकता आणि परिस्थिती असताना हे नवे कर्मचारी कितपत उत्साहाने कामावर येतील अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.







